Maharashtra Cabinet Expansion : विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीलाही लागले आहेत. नेते मंडळी सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मागणी महायुतीमधील काही आमदारांकडून सुरु असल्याचं बोललं जात आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याचीही चर्चा आहे.
आता सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य करत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. “मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे”, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
“मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, ही शेवटची संधी आहे. त्यामुळे बरेच आमदार मागे लागले आहेत की मंत्रिपदाचं स्वप्न किमान दोन महिन्यांसाठी तरी पूर्ण करा. त्यामुळे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा महायुती सरकारचा शेवटचा प्रयत्न आहे. कारण परत महायुतीचं सरकार येईल याची खात्री नाही. त्यामुळे जर पुन्हा सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसांसाठी तरी मंत्री करा, असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
संजय शिरसाट काय म्हणाले?
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: सांगितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. याचा अर्थ मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मात्र, कधी? काय आणि कोणत्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल? यावर आम्ही भाष्य करू शकत नाहीत”, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
शिरसाट काल काय म्हणाले होते?
“मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, अशी बातमी हायकमांडच्या माध्यमातून आली की कोणत्या माध्यमातून आली हे माहिती नाही. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला पाहिजे. अन्यथा आमदार नाराज होतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे? मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं होणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार हा होईल”, असं संजय शिरसाट यांनी बुधवारी म्हटलं होतं.