Maharashtra Political Crisis : शिवसेनेते बंडखोरी झाली तेव्हा सुरुवातीला २५ आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले होते. त्यानंतर हळूहळू करून ४० आमदार त्यांच्याकडे गेले. परंतु, दोन आमदार ठाकरे गटाकडे परतले होते. तसंच, उर्वरित आमदारांनाही परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यासाठी अल्टिमेटमही जाहीर करण्यात आला होता. परंतु, या अल्टिमेटमकडे दुर्लक्ष करून बंडखोर आमदारांनी शिंदेंना साथ दिली होती. आता असंच चित्र राष्ट्रवादीच्या बाबतीत तयार झालं आहे. अजित पवारांसोबत नक्की किती आमदार गेले आहेत, याची आकडेवारी अद्यापही अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. परंतु, शपथ घेतलेल्या नऊ आमदारांना जयंत पाटील यांनी आवाहन केलं आहे.
“गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. “आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही. त्यांना परत येण्याकरता आम्ही पूर्ण संधी देऊ”, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं. “परंतु, जे येणार नाहीत. जे पार्टीची लाईन सोडून जातात (पक्षाच्या धोरणाविरोधात काम करतात) त्यांच्यावर आवश्यक कारवाई आम्ही करू. सगळेच आमदार नाहीत, परंतु, बहुतेक आमदार आमच्या संपर्कात आहेत”, असंही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा >> “…तर विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल”, जयंत पाटील यांचं वक्तव्य
आमदारांच्या अपात्रतेचं पीटिशन अध्यक्षांपर्यंत पोहोचलं
काल ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन भाजपासोबत शपथ घेण्याचं काम केलं त्याक्षणी ते ९ जण अपात्र झाले आहेत. त्यासंदर्भातील पीटिशन विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं आहे. आज सकाळी अध्यक्षांशी बोलणं झालं. ते पीटिशन त्यांच्यापर्यंत पोहोचलं असून त्यावर ते विचार करत आहेत, असं ते म्हणाले. आणि लवकरात लवकर आमचं म्हणणं एकण्यासाठी संधी द्यावी अशी विनंती केली आहे, असंही जयंत पाटलांनी सांगितलं.
हेही वाचा >> “देशात आणि राज्यात उलथापालथ करणाऱ्या प्रवृत्ती बाजूला करणं…” शरद पवार यांचं भावनिक आवाहन
…तर विरोधी पक्षनेता काँग्रेसचा होईल
“विधानसभेचे अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतली. आमची संख्या ९ जणांनी कमी झाली आहे, कारण ते गेलेल आहेत. उरलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. आम्हाला काँग्रेस पक्षाशी वाद करायचा नाही. आम्ही बसून निर्णय घेऊ. आमची संख्या कमी असेल तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो, यासाठी काही दिवसांचा कालावधी जाऊ शकतो”, असंही जयंत पाटील म्हणाले.