राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. वकील अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाकडून युक्तिवाद करणार आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. निवडणूक आयोगाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सुरू असल्याचा निर्णय द्यावा लागेल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेसारखं राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “शिवसेना आणि आमच्या प्रकरणात फरक हाच की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशातील २७-२८ राज्यात आहे. यातील २४ पेक्षा अधिक राज्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. आमदार गेले म्हणजे पक्ष जातो, हे चुकीचं आहे. पक्षाबाहेर जाणं, हा आमदारांचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्ष जाण्याची शक्यता नाही.”

“अजित पवार यांची मनसेबाबतची एक क्लिप फिरत आहे. एकंदर वस्तुस्थिती पाहिली, तर शरद पवारांच्या बाजूनं निर्णय लागणार आहे. पण, निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला, तर देशात काय चाललं हे सांगण्याची गरज नाही,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.

हेही वाचा : ‘या माणसानं देशाचं वाटोळं केलं’, जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनंतर अण्णा हजारे आक्रमक; दिला ‘हा’ इशारा

निवडणूक आयोगानं वेगळा निर्णय दिला, तर सर्वोच्च न्यायालयात जाणार का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “चुकीचा निर्णय दिला, तर न्यायालयात जाणार. पण, निवडणूक आयोग चुकीच निर्णय घेणार नाही. २ जुलैला काही लोक सरकारमध्ये सामील झाले. ५ तारखेला ही लोक सांगतात ३० जूनला शरद पवार यांना हटवून दुसऱ्यांना अध्यक्ष करण्यात आलं. देशातील एवढ्या मोठ्या नेत्याला बदलण्याचा निर्णय ३० जूनला झाला. ५ जुलैला कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दाखल केल्यानंतर ६ जुलैला सर्वांना कळलं. हा एक विनोदच आहे.”

हेही वाचा : “तू कोण आहे, तुला कशाला…”, एकेरी उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका

‘जून २०२२ मध्ये जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ५१ आमदारांनी शरद पवारांना पत्र दिलं,’ असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. याबाबत विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटलं, “अजिबात हे खरे नाही. आम्ही कुठलंही पत्र दिलं नाही. जितेंद्र आव्हाड मी किंवा अन्य कुणीही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil on ncp hearing election commission shivsena ajit pawar ssa
Show comments