राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी भूमिका अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. पण या बैठकीचं आमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच दिलं नसल्याचं समोर आलं आहे. याबाबतचा खुलासा जयंत पाटील यांनी स्वत: केला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर, शरद पवारांनी मंगळवारी राजीनामा दिल्यानंतर आज (बुधवारी) सकाळी जयंत पाटील पुण्यातील साखर संकुल येथे एका नियोजित बैठकीसाठी आले. पण आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक आहे, या बैठकीबाबत जयंत पाटलांना काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. पण बैठकीतून शरद पवारांनी फोन केल्यानंतर जयंत पाटील मुंबईला रवाना होणार आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले, “आज ही बैठक होणार आहे, हे मला माहीत नव्हतं. मला याची कुणीही कल्पना दिली नव्हती. आज माझी साखर आयुक्तांबरोबर नियोजित बैठक होती, त्यासाठी मी सकाळी मुंबईतून पुण्याला आलो. ही बैठक पार पडल्यानंतर मी परत मुंबईला जाणार आहे.”

हेही वाचा- “राष्ट्रवादीचा राज्यातला कारभार अजितदादा…”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “सुप्रियाताई…”

जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं, हे कार्यकर्त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आज सकाळपासून मी मुंबईत नाही. मला अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांनी फोन करून सांगितलं की, पवारसाहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.”

हेही वाचा- राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘या’ पदाचा दिला राजीनामा, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळेंचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, याबाबत काय चर्चा झाली? ते मला माहीत नाही. माझ्यासमोर तरी अशी काहीही चर्चा झाली नाही. तसेच मी राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आमच्या पक्षात कोणत्या पदाची तरतूद आहे? कोणत्या पदाची काय व्यवस्था आहे? हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil on ncp meeting in mumbai with sharad pawar chief post ajit pawar supriya sule rmm