Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली. ‘माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर ते पक्षात नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. दरम्यान, यानंतर अखेर जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपल्याला आता बाहेर बोलण्याचीही चोरी झाली असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
“मी नाराज वैगेरे काही नाही. पण आता कसं झालंय की मला बाहेर बोलायची चोरी झालेली आहे. मी जे भाषण केलं त्याचा रेफरन्स तुम्ही पाहा. शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठी जो मोर्चा आला होता, तेव्हा मी सांगितलं की कालांतराने लोक मोबदला वाढला की बदलतात. त्यामुळे तुमचं सर्वांचं नक्की आहे का? तसेच राजू शेट्टी यांनी याचा झेंडा हातात घेतला म्हटल्यावर काहीही अडचण नाही. आता हा विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. त्यांना आम्ही उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे तुम्ही माझं काही गृहीत धरू नका, तुमचं आंदोलन सुरू ठेवा. तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, अशी त्यामागची भावना होती. पण यामधून लगेच मी पक्षावर नाराज आहे आणि मी पक्ष सोडणार आहे इथपर्यंत चर्चा गेली. मी रोज स्पष्टीकरण देणंही बरोबर नाही”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
‘त्या’ विधानाचा इशारा शरद पवारांना आहे का?
‘माझं काही खरं नाही’, या विधानाचा इशारा शरद पवारांना आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, “आम्ही एका कुटुंबातील आहोत, आम्ही असं एकमेकांना इशारा देत बसत नाहीत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे. आमचा निवडणुकीत पराभव झालेला असला तरी शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. त्यांचा तो पक्ष आहे. त्यामुळे आम्ही जे काही असेल ते एकत्रित निर्णय घेऊ. एकट्याने कोणी इकडे जाऊ आणि तिकडे जाऊ असा कोणताही निर्णय आम्ही चर्चेलाही घेत नाहीत”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता मोठा दावा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्या पक्षात लवकरच भूकंप होईल आणि जयंत पाटील हे लवकरच उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलं होतं.