Jayant Patil on Rahul Narwekar : राज्यात विधानसभेचे विषेश अधिवेशन चालू असून राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. तसंच, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनीही त्यांचं हटके अंदाजात कौतुक केलं. राहुल नार्वेकरांनी मागच्या अडीच वर्षांत कशाप्रकारे सहकार्य केलं, याचा पाढाच त्यांनी वाचला.
जयंत पाटील म्हणाले, “मागच्या अडीच वर्षांत उत्तमपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदावरून काम केलं. मला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूचं कमी ऐकायला कमी येतं. पण राहुल नार्वेकरांच्या अडीच वर्षांच्या काळात आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं. ते करत असताना संख्याबळावर फारसं बोट ठेवलं नाही. तोच स्वभाव तुमचा कायम राहील अशी अपेक्षा करतो.”
हेही वाचा >> Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
मी राहुल नार्वेकरांना सांगत होतो, मंत्रिपद घ्या!
“कुलाबा मतदारसंघ महाराष्ट्रातील सर्वांत लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती-धर्मातील लोक येथे राहतात. मासे मारणारे कोळी समाजातील लोक या भागात राहतात. अतिक्रमणही याच मतदारसंघात आहे. त्यात तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आलात. तसंच, सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली. मी नेहमी खासगीत सांगायचो की तुम्ही मंत्री व्हा. तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल. पण अध्यक्षपद देणं हा तुमच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यात खोलात जायचं नाही”, असंही जयंत पाटील म्हणाले.
राहुल नार्वेकरांनी मासे खाऊ घातले, जेवण दिलं
ते पुढे म्हणाले, “छोट्याश्या मतदारसंघात विधानभवन येतं. तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून अत्यंत काळजी घेतली आहे. दालनं सुरेख केली आहेत. वाद घालण्यासाठी तुमच्याकडे येणाऱ्यांना तुम्ही गरम कॉफी देऊन बाहेर घालवले आहे. मासेही खाऊ घातले, जेवणही दिलं. बिझनेस अॅडवायजरी कमिटीचा दर्जा इतका उंचावत गेला की तुम्हीच अध्यक्ष राहावं असं मनोमन वाटत होतं”, असंही जयंत पाटली म्हणाले.
पुन्हा पाहुणचाराचा लाभ मिळेल अशी अपेक्षा
“राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तुमचे अभिनंदन करतो. तुमच्या कार्यकाळात आमची पाच वर्षे कशी जातील हे कळणार अशी अपेक्षा व्यक्त करतो. वारंवार तुमच्या जेवणाचा आणि पाहुणचाराचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो”, असंही जयंत पाटील जाता जाता म्हणाले.