मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा तापला आहे. अशातच शरद पवार ‘ओबीसी’ असल्याचा दावा प्राध्यापक नामदेव जाधव यांनी केला आहे. नामदेव जाधवांनी सोशल मीडियावर एक प्रमाणपत्र शेअर केलं आहे. त्यात शरद पवार हे ‘ओबीसी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रतिक्रिया देत नामदेव जाधवांना सुनावलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “हे अत्यंत चुकीचं प्रमाणपत्र आहे. नामदेव जाधव प्रसिद्धीसाठी शरद पवारांबद्दल गैरसमज पसरवत आहेत. तसेच, पवारांना बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत. मूळ मुद्द्यावर लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रयत्न दिसतोय. शरद पवारांच्या शाळेतील दाखल्यावर ‘मराठा’ म्हणून उल्लेख आहे.”
“कुणीही शरद पवारांच्या प्रमाणपत्रावर बदल करून काहीही दाखवत असतील, तर महाराष्ट्रातून कार्यकर्ते तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे चुकीचं पसरवणारे तक्रारींना तोंड देतील,” असा इशारा जयंत पाटलांनी दिला.
हेही वाचा : “…तर शिंदे गट अडचणीत येईल”, राहुल नार्वेकरांचा उल्लेख करत रोहित पवारांचं सूचक विधान
“दाखला इंग्रजीत असू शकतो का?”
याप्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केलं आहे. “हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.