सांगली : राम मंदिर उभे राहतेय याचा निश्चितच आनंद असून, आपणही गर्दी कमी झाल्यानंतर अयोध्येला जाणार आहे. दरम्यान प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. त्यानिमित्त आपल्या तालुक्यातील गावोगावी अक्षता कलशाचे आगमन होत आहे. याचे सर्वानी उत्साहाने आणि भक्तिभावाने स्वागत करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले.
आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील हे मनाने महायुतीसोबतच असल्याचे विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या विधानास महत्व प्राप्त झाले आहे. राजारामबापू कारखान्यावर श्रीराम मंदिरातील अक्षता कलशपूजन झाल्यानंतर आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात रामराज्य यावे ही जनतेची अपेक्षा आहे. राम मंदिर उभे राहतेय याचा निश्चितच आनंद आहे. वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावातच राम होता. त्यांनी १९८२ साली साखराळे येथे राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर विधानसभेचे माजी सभापती वि. स. पागे यांच्या हस्ते श्रीराम मंदिराची पायाभरणी करून राम मंदीर उभे केले आहे. सध्या हे मंदिर परिसरातील राम भक्तांचे पवित्र तीर्थस्थान ठरले आहे. या सोहळय़ाच्या निमंत्रणावरून वाद व्हायला नको होता, असे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>राज्यात अवकाळीचे नुकसान बारा लाख हेक्टरवर; २३.९० लाख शेतकऱ्यांना १४०० कोटी रुपयांच्या मदतीची गरज
शिरसाट यांच्यावर टीका
मी मनाने कोठे आहे हे आमदार संजय शिरसाट सांगत असले, तरी त्यांचे आणि माझे कधी बोलणेच झालेले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, असे वाटते. ते न्यायालयात टिकेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. मात्र, हा प्रश्न सरकारला अडचणीचा ठरू शकतो, असेही पाटील या वेळी म्हणाले.