चित्त्यांसमोर भक्ष म्हणून जिवंत काळवीट सोडणे क्रुरता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. चित्त्यांपुढे जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा त्यांना इतर पद्धतीने अन्न दिले पाहिजे, अशी मागणी पाटलांनी केली आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात बिश्नोई समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
काळवीटाला बिश्नोई समाजात महत्त्वाचे स्थान आहे. चित्त्यांना शिकारीसाठी सोडण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये काळवीटांचादेखील समावेश आहे. ही कृती चुकीची असल्याचे बिश्नोई समाजाने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हरियाणातील काही भागांमध्ये या समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Cheetah Vs Leopard : चित्ता आणि बिबट्यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनंतर भारतात परतले आहेत. १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियातून आठ चित्ते भारतात विशेष विमानाने आणण्यात आले आहेत. हे चित्ते सध्या मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात आहेत. या चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट कॉलर आयडीची मदत घेतली जात आहे. “आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार चित्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कुनो अभयारण्यात सोडलेले चित्ते पाहण्यासाठी देशवासियांना काही महिने वाट पाहावी लागेल” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्ते अभयारण्यात सोडल्यानंतर म्हटले होते.