अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात मोठी फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.
दरम्यान, निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते पक्षात कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत, असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. अजित पवार गटाच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
“लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं, ही शरद पवारांच्या कामाची शैली आहे. त्यांनी हुकूमशहा प्रवृत्तीने कधी निर्णय घेतला, असं मला कधी जाणवलं नाही. पण सगळ्यांचं ऐकून घेतल्यानंतर शरद पवार जे निर्णय घ्यायचे, त्यानंतर त्यावर कुणी मतं व्यक्त करायची नाहीत. शरद पवारांचा तो निर्णय अंतिम असायचा,” अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.