राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं दोन दिवसीय शिबीर चालू आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी हे शिबीर महत्त्वाचं मानलं जात आहे. परंतु, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे या शिबिराला गैरहजर आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात वाद असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. या वादामुळेच रोहित पवार हे जयंत पाटलांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या शिबिराला गैरहजर असल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटलांचे विरोधकही यावरून टीका-टिप्पणी करत आहेत. यावर स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना रोहित पवारांबरोबरच्या वादाच्या चर्चेवर प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, पक्षाचं हे शिबीर आज आणि उद्या (२, ३ जानेवारी) असं दोन दिवस चालणार आहे. रोहित पवार हे सध्या परदेशात गेले आहेत. या शिबिराची तारीख ठरली त्याच दिवशी ते मला म्हणाले की या शिबिराला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी आधीच त्यांचं नियोजन केलं होतं. तरी त्यांनी सांगितलं आहे की शिबिराच्या पहिल्य दिवशी त्यांना शक्य नसलं तरी ते आज संथ्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याचा प्रयत्न करतील.
यावेळी जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा रोहित पवारांशी काही वाद आहे का? त्यावर जयंत पाटील म्हणाले, मी खूप गरीब माणूस आहे. माझा कुणाशीही वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. रोहित पवार परदेशातून लवकर येतील आणि पक्षाच्या कामात सहभागी होती.
हे ही वाचा >> “७० हजार कोटी खाणारा बंदर मांडीवर जावून बसला आणि पोपट झाला”, विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने दावा केला जात आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेतील (उद्धव ठाकरे गट) नेते लवकरच आमच्या मंचावर दितील. या दाव्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील म्हणाले, विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजेच आपल्याकडे चीनसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याचबरोबर, प्रसारमाध्यमं ठामपणे उभी न राहणं, प्रसारमाध्यमांवर दबाव आणणं, म्हणजेच लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडी राज्यात ठामपणे उभी आहे. ही आघाडी आगामी निवडणुकीत राज्याला समर्थ पर्याय देईल.