राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी भूमिका अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तसेच शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. जोपर्यंत शरद पवार राजीनामा मागे घेत नाहीत, तोपर्यंत उपोषण करू, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, अध्यक्षपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात कोणतेही गट पडले नाहीत, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- “मुंबईतील बैठकीबद्दल कुणीही कल्पना दिली नाही”, जयंत पाटलांचं विधान
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून दोन गट पडल्याची चर्चा आहे, याबाबत विचारल असता जयंत पाटील म्हणाले, “तुम्ही आमच्यात गट पाडू नका, आमच्यात दोन गट नाहीयेत.”
हेही वाचा- “…तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करणारच”, राष्ट्रवादीतील अस्थितरेदरम्यान बावनकुळेंचं मोठं विधान
राष्ट्रवादीतील अस्थिरतेवर भाष्य करताना जयंत पाटील पुढे म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देणं, हे कार्यकर्त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, असं सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे. आज सकाळपासून मी मुंबईत नाही. मला अनेक आमदार, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्षांनी फोन करून सांगितलं की, पवारसाहेबांनी राजीनामा देणं योग्य नाही, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे.”