राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत. संबंधित निर्णय लगेच मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले. यावेळी जयंत पाटील म्हणाले, “आम्ही शरद पवारांच्या नावाने मतं मागतो, आज शरद पवारच बाजुला गेले तर आम्ही लोकांसमोर कुणाच्या नावानं जायचं, हा आमचा पहिला प्रश्न आहे. शरद पवारांनी अजूनही अध्यक्षपदावर राहणं, महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशाच्या राजकारणासाठी गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्या नावानेच ओळखला जातो. शरद पवारांनी असं अचानक बाजुला जाण्याचा हक्क त्यांनाही नाही.”

“परस्पर असा निर्णय घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यांनी असा निर्णय घेणं, आम्हाला आणि देशातील कोणत्याही व्यक्तीला मान्य होणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय मागे घ्यावा,” अशी विनंती जयंत पाटील यांनी केली.

“त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला सर्वांना इथून पुढेही पाहिजे. आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाहून राजकरण केलं. आजही त्यांच्याकडून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आम्ही राजकारणात वावरतो. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याची भाषा केली. पवारसाहेब, आम्ही तुम्हाला सगळा अधिकार देतो, पण देशाच्या सर्वोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा आहे, ती दुसऱ्या कुणालाही जमणार नाही. तुम्ही आमच्या सगळ्यांची राजीनामे घ्या. तुम्हाला पक्ष कोणत्या नव्या लोकांच्या हातात द्यायचाय तो द्या. पण तुम्ही पक्षाच्या प्रमुख पदावरून बाजुला जाणं, हे कोणाच्याच हिताचं नाही. आम्हाला तुमच्या छायेखाली काम करायची सवय लागली आहे. तुम्ही बाजुला गेलात तर आम्ही कुणीच काम करू शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल तर आम्ही सगळे थांबतो. हा पक्ष ज्यांना चालवायचाय त्यांना चालवू द्या,” असं भावनिक आवाहन जयंत पाटील यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil reaction over sharad pawar retirement ncp president rmm
Show comments