राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे या दोन नावांची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन भाजपावर टीका केली आहे.

“विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून एक अतिरिक्त अर्ज भरण्याचे ठरवण्यात आले आहे. पक्षात कुणाच्या नावाला विरोध नव्हता. एकमताने हा निर्णय पक्षाने घेतला आहे. या दोन ज्येष्ठ नेत्यांना संधी पक्षाने द्यायचा निर्णय घेतला आहे. बाहेर ज्या बातम्या आहेत त्या पूर्णपणे खोट्या व चुकीच्या आहेत,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“भाजपाचे सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फसले असल्यामुळे सध्या घोडेबाजार करायच्या मनस्थितीत दिसते. तोच प्रयत्न राज्यसभा निवडणुकीत चालला आहे. सुदैवाने राज्यसभेच्या निवडणूकीत पक्षाच्या अधिकृत आमदारांना आपलं मत दाखवण्याची तरतूद आहे परंतु अपक्षांना नाही. त्यामुळे ते सर्व अपक्षांच्या मागे लागले आहेत,” असेही जयंत पाटील म्हणाले.

“भाजपाचे १०६ आमदार आणि पाठिंबा दिलेले काही आमदार आहेत त्यांच्या जीवावर निवडून येतील तेवढे निवडून आणणं हे लोकशाही सुदृढ ठेवणं योग्य होतं. पण इतर पक्षाचे आमदार खेचून आणण्याचा जो प्रकार सुरु आहे तो योग्य नाही. लोकशाहीच्या प्रथा, परंपरा व लोकशाहीत घोडेबाजार होऊ न देणं या सगळ्या चौकटीत राहून काम करणं गरजेचं आहे,” असेही जयंत पाटील यांनी भाजपाला सुनावले आहे.

Story img Loader