राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे पक्षाचे दोन गट झाले आहेत. पक्ष फूटीनंतर दोन्ही गट सातत्याने आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच अजित पवार गटातील नेत्यांनी थेट अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. दोन्ही गटात तणाव निर्माण झालेला असताना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (अजित पवार गट) यांनी शुक्रवारी (१० नोव्हेंबर) शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, मला त्यावर काही भाष्य करायचं नाही. कुटुंबाने कुठे भेटावं? काय करावं? याविषयी तुम्ही किंवा मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाविषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावं? याविषयी मी भाष्य करणं उचित नाही.

तत्पूर्वी, पुण्यातील मोदी बाग या निवासस्थानी दिलीप वळसे-पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यापाठोपाठ अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीच्या बातम्यांना शरद पवारांच्या बहिणीने दुजोरा दिला आहे. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, हे आमच्या कुटुंबाचं स्नेहसंमेलन होतं. दरवर्षी आम्ही सर्वजण एकत्र येतो. आमचं संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो. आम्ही गप्पागोष्टी करतो, एकमेकांची थट्टा-मस्करी करतो. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार यांच्यासह कुटुंबातले सर्वजण उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil rection on ajit pawar sharad pawar meeting asc
Show comments