यंदाची लोकसभा निवडणूक पार पडली असून उद्या म्हणजेच चार जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. संपूर्ण जगाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल असे दावे सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत. या निवडणुकीच्या एक्झिट पोल्समध्येही अशाच प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होईल आणि त्यानंतर विरोधी पक्षांमधील अनेक नेते भाजपात प्रवेश करतील, असे दावे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमधील नेते करत आहेत.
“४ जूननंतर (लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर) महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील. सातारा, सांगली, नागपूरसह मराठवाड्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपात जाणार आहेत”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते अनिल पाटील यांनी केला आहे. अनिल पाटील यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “मला पक्ष सोडायचा असता तर मी याआधीच या गोष्टीचा विचार केला असता. आम्ही सध्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी काम करत आहोत.”
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, “येत्या ४ तारखेनंतर आपल्याला राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळतील. पुढील महिन्याभरात या घडामोडी घडतील. काही नेते भाजपात जाणार असल्याची चर्चा चालू आहे, ही चर्चा २०१९ पासूनच चालू आहे. त्यांना २०१९ च्या निवडणुकीआधीच भाजपात जायचं होतं. मी कोणाचं नाव घेणार नाही, मात्र ४ तारखेनंतर तुमच्यासमोरील चित्र स्पष्ट होईल. जालना, सातारा, सांगली, नागपुरातील काही नेत्यांच्या नावांची चर्चा मी ऐकली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बलाढ्य नेत्यांची मानसिकता बदलली आहे. हे नेते आत्ता जिथे आहेत तिथे त्यांना थांबायचं नाही.”
हे ही वाचा >> “आदळआपट करून काय साध्य करणार?” पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल; म्हणाल्या, “उद्या काहीही होऊ शकतं”
अनिल पाटलांच्या दाव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) हे आमचे मित्रपक्ष आहेत. आम्ही एकसंघपणे राज्यात पुढच्या निवडणुका लढणार आहोत. आमच्यातील कोणीही भाजपाच्या संपर्कात नाही. मुळात आम्हाला यावर स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. कोण कुठे आहे आणि कुठे थांबणार आहे हे लोकांना चांगलंच माहिती आहे. मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे उद्या निकालातही तुम्हाला सकारात्मकता दिसेल. तसेच मला हा पक्ष सोडायचा असता तर मी यापूर्वीच तसा विचार केला असता. आम्ही आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) वाढवण्याचं काम करणार आहोत.”