एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सर्वांना प्रतीक्षा होती. परंतु, वर्षभर मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा चालू असतानाच सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पक्षातील अनेक आमदारांना घेऊन महायुतीत सहभागी झाले. अजित पवारांबरोबर गलेल्या आठ आमदारांना मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यानंतर आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात होतं. परंतु, तशा कोणत्याही हालचाली अद्याप पाहायला मिळाल्या नाहीत. शिंदे गटातील अनेक नेते मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. रायगडचे आमदार भरत गोगावले आणि आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. परंतु, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला. जयंत पाटील हे केवळ शरीराने तिकडे (शरद पवार गटात) आहेत, परंतु, मनाने अजित पवारांबरोबरच आहेत. आज जरी ते निष्ठेच्या गप्पा मारत असले तरी त्यांनीच पुण्यातल्या बैठकीत सांगितलं होतं की, आपण शरद पवारांशी चर्चा करून महायुतीत जाऊ. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या. त्यामुळे जयंत पाटील यांनी या निष्ठेच्या गप्पा थांबवाव्यात. जयंत पाटील यांना आमच्याकडे यायला फार वेळ लागणार नाही.

संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले, माझं आणि संजय शिरसाट यांचं कधी बोलणं झालेलं नाही. त्यामुळे माझ्या मनात काय आहे हे त्यांना कसं कळणार? ते तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्यांनाच विचारलं पाहिजे. एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, मग तुम्ही त्यावर दुसऱ्या नेत्याला जाऊन प्रतिक्रिया विचारता, हे कसं चालेल. ते वक्तव्य करण्यामागे संजय शिरसाट यांचा नेमका उद्देश काय ते मला माहिती नाही.

हे ही वाचा >> “महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला, आता फक्त…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

दरम्यान, जयंत पाटील यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र सर्वांसमोर स्पष्ट केलं जाईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil reply on sanjay shirsat claim ncp leader was joining nda so cabinet expansion delayed asc
Show comments