सांगली : हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले असले तरी या मतदारंसघात समाविष्ट असलेल्या वाळवा, शिराळा मतदार संघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्याने जयंत पाटील यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट होते.
आमदार पाटील यांचे प्राबल्य असलेले जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा हे दोन मतदार संघ. वाळव्याचे प्रतिनिधीत्व प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे तर शिराळ्याचे प्रतिनिधीत्व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडे आहे. या दोन्ही ठिकाणी आघाडीचे मताधिक्य ठळकपणे लोकसभा निवडणुकीत दिसून आले. महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना यांचेही मतदान असले तरी सद्यास्थितीत हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुरक्षित असल्याचेच लोकसभा निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. वाळव्यात आघाडीला १७ हजार ४८१ अणि शिराळ्यात ९२८१ मते महायुतीपेक्षा जादा मिळाली आहेत.
हेही वाचा >>> नगरमध्ये मतांचे ध्रुवीकरण पवार गटासाठी निर्णायक
सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच ठिकाणी सुरू झाली आहे. वाळवा मतदार संघामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना अडकवून ठेवण्याची रणनीती विरोधकांची असली तरी विरोध संघटित होत नाही हीच आमदार पाटील यांची जमेची बाजू म्हटली पाहिजे. मतमोजणी होण्यापूर्वीच आमदार पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी महायुतीचा प्रचार केला नसल्याचा आरोप करीत भाजप व शिवसेना मधील काही मंडळींनी त्यांच्यावर पक्षाकडे कारवाईची मागणी केली. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, विक्रम पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार आदींचा समावेश होता. तर महायुतीतील जागा वाटपात ही जागा कोणाकडे जाते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गौरव नायकवडी हे उमेदवार होते, तर भोसले-पाटील यांनी युतीतून बंडखोरी करत आमदार पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या निवडणुकीमध्ये मतविभाजनाचा फायदा नेहमीप्रमाणे आमदार पाटील यांना झाला. यावेळी शिवसेनेचे पवार ही महायुतीतून उमेदवारीसाठी आग्रही राहणार असे प्रथमदर्शनी दिसत आहे. विरोधकांतील बेकीच प्रस्थापितांच्या मदतीला आली. यावेळी जर हे आव्हान अधिक ठोसपणे उभे करायचे असेल तर विरोधकांची मोळी अगोदर बांधण्याची गरज आहे. नजीकच्या काळात हे होईल का हा खरा प्रश्न आहे. आमदार पाटील हे राज्याचे नेते आहेत. राज्यात त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. यामुळे या पक्षाचा पर्यायाने आमदार पाटील यांचे या निवडणुकीतही मनोबल चांगले राहणार यात शंका नाही. मात्र, पक्षाचे काम करत असताना स्वत:च्या मतदार संघासह शेजारच्या शिराळा मतदार संघाकडे दुर्लक्ष होणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली आहे.