राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अजूनही कायम आहे. निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी गेल्या आठवड्यात पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात जाऊन शरद पवार आणि त्यांच्या गटातील नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत लंके आणि शरद पवार या दोघांनीही मौन बाळगलं. परंतु, लंके शरद पवार गटात जातील असं बोललं जात आहे.
निलेश लंके यांनी आत्ता शरद पवार गटात जाण्याबाबत किवा अजित पवार गटाविरोधात कोणतंही वक्तव्य केलं तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होऊ शकते. त्यामुळे निलेश लंके सध्या सावध पावित्र्यात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, निलेश लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. ते तिथून लोकसभेसाठी उभे राहिले तर १०० टक्के निवडून येतील. त्यांच्याबाबत आम्ही या मताचे आहोत की, लंके आमचे उमेदवार व्हावेत. त्याबाबतीत आवश्यक ते सोपस्कार आम्ही योग्य वेळी पूर्ण करू. मी निलेश लंके यांना तुतारी (तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचं निवडणूक चिन्ह आहे.) भेट दिली होती. ती तुतारी त्यांनी घेतली. परंतु, मी असं कोणतंही वक्तव्य करणार नाही, ज्यामुळे निलेश लंके अडचणीत येतील.
हे ही वाचा >> “अहमदनगरमध्ये तुतारी वाजणार”, निलेश लंकेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
जयंत पाटील म्हणाले, निलेश लंके यांनी तुतारी स्वीकारली की नाही याबाबत मी सध्या भाष्य करणार नाही. कारण असं केल्याने लंके अडचणीत येऊ शकतात आणि मला त्यांना अडचणीत आणायचं नाही. परंतु, मी एक गोष्ट ठामपणे सांगेन की आम्ही अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर लोकसभा जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.