महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून राज्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे बॅनर्स आणि पोस्टर्स राज्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांकडे पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सध्याचं एकनाथ शिंदे सरकार कोसळेल आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येईल अशीही चर्चा आहे. असं झाल्यास अजित पवार मुख्यमंत्री पदावर बसतील, असं म्हटलं जाऊ लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल. तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केलं आहे. पाटील म्हणाले, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल.

हे ही वाचा >> “केंद्रातून फोन आल्यावर…”, बारसू रिफायनरीबाबत प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले “कोकणाची…”

राष्ट्रवादी काँग्रेस मविआतला मोठा पक्ष

राज्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार होते. परंतु आता शिवसेनेचे ४० आमदार फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला मोठा पक्ष आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil says next maharashtra cm will be from ncp asc
Show comments