अवघ्या १० दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडखोरीमुळे राज्यातली सत्तासमीकरणं बदलली आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत आपण सरकारबरोबर असल्याचं स्पष्ट केलं. आपल्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. मात्र, शरद पवार गटाकडून हा दावा फेटाळण्यात येत होता. अगदी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी ९ मंत्री वगळता इतर सर्व शरद पवारांबरोबर असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, आता जयंत पाटलांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार अजित पवारांबरोबर असल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तबच झाल्याचं बोललं जात आहे. येत्या १७ जुलैपासून मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात शिंदे गट, भाजपा व अजित पवार गट यांच्या जवळपास २०० आमदारांविरोधात विरोधी पक्षाचे इतर आमदार असा सामना पाहायला मिळणार आहे. स्वत: अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण होणार? यावर निर्णय होणं महत्त्वाचं ठरलं आहे.
सर्वाधिक आमदार असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. मात्र, जयंत पाटलांनी आज विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाईल असं चित्र सध्या दिसतंय, असं विधान केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार अजित पवारांकडे गेल्याच्या चर्चांना बळ मिळालं आहे.
“काँग्रेसचा विरोधीपक्षनेता होईल असं दिसतंय. संख्याबळ जवळपास स्पष्ट व्हायला लागलं आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणं शक्य आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ”, असं जयंत पाटील म्हणाले.
“त्यांचेच प्रश्न, तेच उत्तर देणार!”
दरम्यान, अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादीच्या लोकांनीच विचारले होते, असा खोचक टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला. “१७ तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यास करण्याची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न त्याच लोकांनी विचारले होते. आता त्या बाजूला जाऊन त्या प्रश्नांची उत्तरंही तेच लोक देतील”, असा टोला जयंत पाटलांनी लगावला.