महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी (९ एप्रिल) पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. राज यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. ते म्हणाले, “केवळ नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे.” यावेळी त्यांनी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले आहेत.
गुढीपाडवा मेळाव्याच्या काही दिवस आधी राज ठाकरे यांनी मतदारांना राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका, असं सांगितलं होतं. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडून आलोय असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे याच व्यभिचाराबाबत बोलत असावेत असं म्हटलं जात होतं. अशातच राज ठाकरे यांनी थेट भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
जयंत पाटील म्हणाले, राज ठाकरे आधी राजकीय व्यभिचाराला पाठिंबा देऊ नका असं म्हणाले आणि आता त्यांनीच भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे म्हणाले होते की, राजकीय व्यभिचाराला थारा देऊ नका, हे सांगून त्यांनी महाराष्ट्रात अलीकडेच जे दोन पक्ष फुटलेत आणि राजकीय व्यभिचार झाला आहे, त्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेला आधीच सूचित केलं आहे. मी आता कैदेत आहे, तुम्ही मात्र देशसेवेसाठी पलीकडच्या बाजूला (महायुती) ज्यांनी व्यभिचार केलाय त्यांच्या बाजूने उभे राहू नका, असं सांगण्याचा राज ठाकरे यांनी प्रयत्न केला आहे. मला वाटतं की, समझनेवालों कों इशारा काफी हैं.
हे ही वाचा >> महायुतीत ठाणे लोकसभा भाजपाला? आमदार संजय केळकर इच्छुक; म्हणाले, “पूर्वीची गोष्ट वेगळी होती, आता…”
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल होते”, पटेलांच्या दाव्यावर जयंत पाटलांचं भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शरद पवारदेखील भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते’, असा दावा अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. यावरही जयंत पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, शरद पवार असं कधी म्हटले नाहीत. हेच लोक (प्रफुल्ल पटेल आणि त्यांचे सहकारी) सतत जाऊन शरद पवारांकडे आग्रह करत असतील, त्यावर शरद पवार किती वेळा आणि काय-काय बोलणार. त्यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते पूर्ण करूनच स्वस्थ बसतात. परंतु, त्यांनी नेहमीच मनाविरोधातल्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला. उलट शरद पवार यांना पक्षसंघटना एकत्रित ठेवायची होती. त्यामुळे असं कोणीही काहीही बोलत असतील तर शरद पवारांनी या लोकांची समजूत काढली असेल.