शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच, काही ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते अडचणीतही आले आहेत. आता पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती निवडणुकांबाबत संतोष बांगर यांनी मोठी घोषणा केल्याचा केली होती. त्यांच्या या घोषणेचा व्हिडीओ निवडणुकीच्या निकालांनंतर व्हायरल होऊ लागला आहे.
निवडणुकीच्या आधी संतोष बांगर म्हणाले होते की, “कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही”, असं आव्हान संतोष बांगर यांनी विरोधकांना दिलं होतं. त्यानंतर कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणण्यात संतोष बांगर यांना यश आलं आहे. त्यावरून आता खोचक टीका-टिप्पण्या समोर येऊ लागल्या आहेत.
हे ही वाचा >> “उबाठाचा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे”, आशिष शेलारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारलं, काढली का मिशी त्यांनी (संतोष बांगर यांनी)? कालच गेलेत ते, काढतील मग ते मिशी. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले लोक शब्दांचे पक्के असतात. मिशी काढली तर त्यांचा सत्कार करू आपण.