सलग दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी सुरू असल्याची चर्चा आहे. अजित पवार त्यांच्या गटातील अनेक शिलेदारांसह आज (१७ जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांना मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेटले. या भेटीत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ राहावा यासाठी शरद पवारांनी काहीतरी करावं, अशी विनंती केली. सध्याच्या परिस्थितीत काहीतरी मार्ग काढा असं अजित पवार गटाने म्हटलं. याबाबतची माहिती शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
दरम्यान, पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं की, शरद पवार आणि अजित पवार गटात सुरू असलेल्या बैठकांमुळे संभ्रम निर्माण होत आहे, पक्षात जे सुरू आहे ते शरद पवार यांच्या आशीर्वादानेच सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल. या प्रश्नावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, तुम्ही कुणीही आत्ता किंवा कधीही शरद पवारांना भेटायला गेलात तर ते तुम्हाला भेटतील. ते कोणालाही भेटतात. काल आणि आज तेच घडलं. परंतु कोणीही शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्याचं कारण नाही.
जयंत पाटील म्हणाले, सर्व आमदार शरद पवार यांना भेटायला आल्यावर शरद पवार यांनी मलाही बोलावलं. मी नुकताच राज्यपाल महोदयांना भेटून घरी गेलो होतो. मी आणि विश्वजीत कदम माझ्या घरी चर्चा करत होतो. तेवढ्यात मला शरद पवार यांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं ताबडबोत इकडे (वाय. बी. सेंटर) या. भेटीसाठी आमदार आले आहेत. मी शरद पवार यांना विनंती केली की मला तिथे पोहोचायला उशीर होईल, तुम्ही त्यांना भेटून घ्या. पण मला त्यांनी सांगितलं, तुम्ही आल्याशिवाय मी कोणालाही भेटणार नाही. मला तिथे पोहोचायला वेळ झाला. परंतु तेवढा वेळ ते तिथेच बसले होते. त्यांनी आमदारांची भेट घेतली नव्हती. मी आल्यानंतर त्यांनी भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल शंका घेण्याची गरज नाही.
हे ही वाचा >> शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आजच्या भेटीत काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले…
जयंत पाटील म्हणाले, इथं (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान) आलेल्या प्रत्येकालाच शरद पवार भेटतात. तुम्ही (पत्रकार) कॅमेऱ्याशिवाय आत गेलात तर तुम्हालाही ते भेटतील, वेळ देतील. आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, त्याचा सन्मान ठेवणं, बोलणं, चर्चा करणं गरजेचं आहे. राजकारणात संवाद बंद करायचा नसतो. संवाद थांबवणं योग्य नाही. ते (अजित पवार गट) परत आले तर शरद पवार पुन्हा त्यांना भेटतील, त्यांच्याशी बोलतील.