Jayant Patil on Maharashtra Assembly election 2024 Dates: राज्य विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. पण त्या नेमक्या कधी होणार? याविषयी राज्यभर मोठी चर्चा व उत्सुकता पाहायला मिळत आहे. राज्यातील महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागल्या असून आधी जागावाटप व नंतर उमेदवार निश्चिती अशी प्रक्रियाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांची अद्याप चर्चा होत असताना विधानसभा निवडणुका मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विद्यमान महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्याआधीच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येणं आवश्यक आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत राज्यपाल ही मुदत वाढवू शकतात. या पार्श्वभूमीवर निवडणुकांना उशीर होण्याची शक्यातही गृहीत धरली जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. राज्यात निवडणुका वेळेवर घेण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा
मुंबईत महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने मविआतील सर्व महत्त्वाचे नेत व पदाधिकारी षण्मुखानंद सभागृहात जमा झाले. यानिमित्ताने उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या भाषणांप्रमाणेच दुसऱ्या फळीतील नेतेमंडळींनीही उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या विधानाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
“सरकार निवडणूक कधी घेणार याचा अंदाज येत नव्हता. आज निवडणूक आयोग पत्रकारांसमोर हरियाणा आणि झारखंडची निवडणूक जाहीर करतील. महाराष्ट्र सरकार घाबरणारं सरकार आहे. यांना निवडणुकांची भीती वाटतेय. लोकसभेत महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना मोठा धक्का दिलाय. यांना आता ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याचं धाडस होणार नाही. त्यामुळे दिवाळीनंतरच हे निवडणुका घेतील. १५-२० नोव्हेंबरदरम्यान निवडणुका घेतील असा माझा अंदाज आहे. त्याआधी त्यांची निवडणूक घेण्याची ताकद नाही”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
दोन बेभरवशाचे टेकू!
दरम्यान, जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीका करताना नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू या दोन बेभरवशाच्या टेकूंवर सरकार उभं असल्याचा टोला लगावला. “४०० पारचा नारा देणारे २४० वर थांबले. तेव्हा दोघांचे टेकू घेतले. बिहार आणि आंध्र प्रदेश. दोघं एवढे पलटी मारण्यात माहीर आहेत, की दिल्लीतलं सरकार कधी पडेल याची खात्री नाही. त्यामुळेच ६ महिने की वर्षभर एवढाच विषय राहिलाय. त्यामुळेच लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही तर सेक्युलर सिव्हिल कोड म्हणावं लागलं. सेक्युलर शब्द तुम्हाला वापरावा लागला यातच तुमची हार आली. १० वर्षांपासून तुम्ही भारतात टेंभा मिऱवला त्यात सेक्युलर शब्द कधी वापरला नव्हता. पण आज तुमच्या लक्षात आलं की भारत तुम्हाला सहजासहजी काही चालू देणार नाही”, अशा शब्दातं जयंत पाटील यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
हिंदू देवस्थानांच्या जमिनी सत्ताधाऱ्यांनी लुटल्या – जयंत पाटील
दरम्यान, राज्यातल्या हिंदू देवस्थानांच्या जमिनी सरकारी पक्षातील नेत्यांनी लुटल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. “महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांना शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी देण्यात आल्या होत्या. भाजपाच्या एकदोन आमदारांनी या जमिनी लुटल्या. स्वत:च्या नावावर केल्या. ते करताना नजराणा भरायचा असतो. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करताना भरायचा ५० टक्के नजराणा भरला नाही. विधानसभेत हा विषय मांडला तेव्हा महसूलमंत्री म्हणाले २ महिन्यांत चौकशी करू. पण दोन वर्षांपासून चौकशी पूर्ण झालेली नाही. आता १३ तारखेला कॅबिनेटनं निर्णय घेतलाय की ही नजराण्याची किंमत कमी करून फक्त ५ टक्के असेल. या जमिनींवर आधीच या बहाद्दरांनी इमारती उभ्या केल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांच्या जमिनी लुटण्याचं पाप भाजपाच्या डोक्यावर जातं. त्यावर झाकाझाकी करण्यासाठी हा ५ टक्क्यांचा निर्णय घेतलाय. यावर आधीच न्यायालयात सुनावणी चालू आहे. जमिनी लाटणारेच हा निर्णय व्हावा म्हणून कॅबिनेटच्या बैठकीत बसून होते”, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.