विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करून मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपाला यात घोडेबाजार करता येणार नाही, हे त्यांना दुःख वाटत असेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.
“राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करुन होणार आहे. हे दुःख भाजपाला वाटत असेल. म्हणून लोकशाही, पारदर्शक व महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे,” असेही जयंत पाटील म्हणाले.
“याविरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत हे दुर्दैवी आहे. इथून पुढे अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन उमेदवाराला पाठिंबा देत होणार आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील, याचे भाजपाला दुःख वाटण्याचे कारण काय?”, अशी विचारणाही जयंत पाटील यांनी केली आहे.