दीपक केसरकर हे खरे शिवसैनिक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. शिवसेना फोडण्यासाठी पवारच जबाबदार असल्याचा आरोप केसरकरांनी केल्याचं सांगत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना पाटील यांनी केसरकरच पवार यांना सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरवायचे असं सांगितलं.
नक्की वाचा >> संजय राऊतांविरोधात बंडखोरांमध्ये एवढा रोष का?; शहाजीबापू पाटील म्हणाले, “हा माणूस सकाळी १० वाजता बोलायला…”
केसरकर पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
“मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार होते ही वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहोत. मी राष्ट्रवादीत असताना ते विश्वासात घेऊन सांगायचे”, असं केसरकर यांनी १३ जुलै रोजी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
तसेच पुढे बोलताना, “शरद पवारांनीच मला, जरी मी नारायण राणेंना बाहेर पडण्यासाठी मदत केली असली तरी कोणत्या पक्षात जावं याची अट ठेवलेली नाही असं सांगितलं होतं. हा निश्चितच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण याचा अर्थ नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली होती,” असंही केसरकर म्हणाले.
नक्की वाचा >> भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”
“त्यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब जिवंत होते तेव्हा त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तरही त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. ‘मातोश्री’ कधी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही शरद पवारांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना हे कधीही मान्य नव्हतं,” असंही केसरकर म्हणाले.
नक्की वाचा >> “…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले
केसरकरांना जयंत पाटलांचा टोला
याच टीकेवरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटील यांनी, “दीपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते?,” असे प्रश्न विचारले. तसेच पुढे बोलताना, “सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी दीपक केसरकरच कायम पवार यांच्या मागे असायचे,” अशी आठवणही त्यांनी सांगितली.
नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”
केसरकर हे खरे शिवसैनिक नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले. “आता दीपक केसरकरांचे स्थानिक मतभेद झाले म्हणून ते तिकडे गेलेत. ते काय खरे शिवसैनिक नाहीत. त्यांचं मनही शिवसैनिकासारखं नाही. त्यामुळे दीपक केसरकर आता जे बोलतायत त्यात कुठेही तथ्य नाही,” असं उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं. त्याचप्रमाणे, “कधीही शिवसेना फोडण्याचं काम पवार यांनी केलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे आणि पवार यांचे संबंध लक्षात घेता या गोष्टी निराधार आहेत,” असंही जयंत पाटील म्हणाले.