सोलापूर : छत्रपती शिवरायांची म्हणून शासनाने लंडनहून आणलेली वाघनखे खरी नाहीत तर नकली आहेत, असा इतिहास संशोधकांचा दावा आहे. याच पार्श्वभूमीवर ही वाघनखे गुप्ततेत का आणली, असा प्रश्न पडतो. ही वाघनखे काही मिळविलेली नाहीत तर ती काही दिवसांपुरते भाड्याने आणली गेली आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचा कानोसा घेण्यासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांची वाघनखे, राज्याच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार, मराठा आरक्षण आदी मुद्यांवर भाष्य केले.
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांबद्दल सर्वांनाच आदर आहे. यात वाद नाही. परंतु ही वाघनखे खरी नसून नकली आहेत. खरी वाघनखे तर साताराच्या जलमंदिरातच आहेत, असा दावा इतिहास संशोधक प्रा. इंद्रजित सावंत यांनी केल्याचा हवाला देत जयंत पाटील म्हणाले, शिवरायांची वाघनखे लंडनहून एवढ्या गुप्ततेत आणायचे कारण नव्हते. मुंबईहून साताऱ्यापर्यंत वाजत-गाजत स्वागत करीत वाघनखे आणायला हवी होती. ही वाघनखे काही मिळविलेली नाहीत, तर ती भाड्याने आणली गेली आहेत, अशा शब्दात त्यांनी महायुती सरकारला चिमटे काढले.
राज्यातीला महायुतीचे सध्याचे हे शेवटचे सरकार आहे. हे सरकार पुन्हा स्थापन होणार नाही. म्हणूनच विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा सुतोवाच केला जात आहे. बहुसंख्य असंतुष्टांना संतुष्ट करण्याचा महायुतीचा हा शेवटचा प्रयत्न आहे. पुन्हा सरकार कायम राहील, याची खात्री नाही. किमान उरलेल्या दोन महिन्यांपुरते तरी मंत्री होण्याचे स्वप्न पुरे करा, असा महायुतीच्या बहुसंख्य आमदारांचा आग्रह आहे, असाही टोला जयंत पाटील यांनी मारला.
हेही वाचा – “…तर आम्ही निर्णय घेणार”, बच्चू कडू यांचा महायुती सरकारला इशारा
मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी ज्या ज्यावेळी आंदोलन झाले, त्या त्यावेळी महायुती सरकारने आरक्षणाची पूर्तता करण्याची नुसती आश्वासनेच दिली. प्रत्येकवेळी चर्चेचे गुऱ्हाळ चालविले. अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती पार पाडावी. त्यासाठी विरोधी पक्षांशीही चर्चा करावी. पण तसे काही होताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली.