सांगली : क्रांतीकारकांनी इंग्रजांचे खजिने लुटले ते स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी, मात्र, आता खजिन्याची लूट हे घरे भरण्यासाठी सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली.कासेगाव (ता. वाळवा) येथे क्रांतीवीर बाबुजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेचा ३९ वा वर्धापन दिन आणि बाबुजी पाटणकर यांचा ७३ वा आठवण दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, आ. पाटील, आ.डॉ. विश्वजित कदम, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नाईक, कॉ. संपतराव देसाई, डॉ. भारत पाटणकर आदींसह श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, सत्तेमध्ये गेलेल्यांचे आणि बाहेर असलेल्यांचे काय विचार आहेत, याचे जनता कधी विश्लेषण करते का, असा प्रश्न आहे. कोणत्या विचाराला सत्तेत बसवायचे आणि कोणाला बाहेर ठेवायचे, याचे तारतम्यच उरलेले नाही. आम्हाला विचार स्वातंत्र्य मिळाल्यावर आमचे विचार भरकटायला लागले.सध्या राज्यात विचित्र राजकीय स्थिती दिसत आहे. सत्तेत बसलेले आणि बाहेर बसलेले लोक काय करत आहेत, हेच जनतेला समजेना झाले आहे. सत्तेत जाणे हाच एक विचार झाला असून, यामुळे जनतेचा विकास हा मुद्दा दुय्यम ठरू पाहत आहे. अशा परिस्थितीत लढायचे की शरण जायचे हे ठरविण्याची वेळ आली आहे, असे वाटते.
स्वातंत्र्य लढ्यावेळी या भूमीतील क्रांतीकारकांनी परकीय सत्तेचा म्हणजेच ब्रिटीशांचा खजिना लुटला. लुटलेल्या खजिन्यातून स्वहित न पाहता, चळवळीसाठी या खजिन्याचा वापर करण्यात आला. सध्या मात्र खजिना लुटले जात आहेत, दरोडे घातले जात आहेत आणि घरे भरण्याचा उद्योग करण्याचे काम होत असल्याचे दिसत असल्याची टीका त्यांनी अप्रत्यक्ष महायुती सरकारवर केली. यावेळी बोलताना खा. पवार यांनी स्वातंत्र्यचळवळीत या भागातील क्रांतीकारकांनी मोठे योगदान दिल्याचे सांगत भावी पिढीने हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला दिला.