दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचा दावा
सांगली : भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शिराळय़ाचे शिवाजीराव नाईक व जतचे विलासराव जगताप यांच्याबाबत पक्षातून संशय व्यक्त केला जात असला तरी त्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहेत. सांगलीत माध्यमांशी बोलताना पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत जिल्हयातील दोन माजी आमदार लवकरच पक्षात येत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यांची नावे त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहेत. जिल्हृयात भाजपमध्ये सध्या शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हे चार माजी आमदार आहेत. यापैकी दोघे कोण याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न भाजपमध्ये सुरू आहे.
दरम्यान, कडेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेसनी समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात निश्चितच यश मिळाले असते. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दोन्ही काँग्रेसचे उमेदवार मैदानात उतरल्याने झालेल्या मतविभाजनाचा लाभ भाजपला झाल्याचे दिसून येते असेही पाटील म्हणाले. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसला केवळ सहा जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला एक आणि भाजपला ११ जागी यश मिळाले. तर कवठेमहांकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांनी एकहाती यश मिळवत सत्ता संपादन केली आहे. यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेला वादावादीचा प्रसंग दुर्दैवी असून याची माहिती घेतली जाईल असेही त्यांनी सांगितले.