अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. गुरुवारी ऋतुजा लटके ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचा उमेदवारच फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ऋतुजा लटके यांना ‘बाळासाहेबांची शिवसेना ’ पक्षात आणून आपला पक्ष व भाजपा युतीची उमेदवारी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे.
या सर्व प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “ज्याला उमेदवारी दिली आहे, त्यालाच साम-दाम-दंड-भेदचा वापर करून पळवायचं. आमदारांनाही सर्व मार्गाचा वापर करून पळवायचं, हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. ठाकरे गटाने जो उमेदवार ठरवला आहे. त्यांचा प्रचारही त्यांनी केला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघात १०० टक्के ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येईल, अशी परिस्थिती आहे” अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.
या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या जनमताची छोटीशी चाचणी मुंबईकरांच्या माध्यमातून होईल. पण अंधेरी पूर्व भागात मराठी भाषिकांची संख्या मर्यादीत आहे. तो भाग बहुभाषिक आहे. त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो? हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. असं असताना ठाकरे गटाचा उमेदवारच पळवायचा, असे प्रयत्न शिंदे गटाकडून केले जात असतील, तर ते बरोबर नाही. याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण जनता पाहत आहे. आता पुढच्या विधानसभा निवडणुकीला त्यांच्या विरोधात कुणीही निवडणुकीला उभं राहणार नाही, अशी व्यवस्थाही ते करू शकतात, असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.