सांगली : आपणा सर्वांचे श्रध्दास्थान प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदीर उभारण्यात आले असून या मंदीरात २२ जानेवारी २०२४ ला मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यानिमित्त आपल्या तालुक्यातील गावोगावी अक्षता कलशाचे आगमन झाले आहे. आपण सर्वांनी अगदी उत्साहाने आणि भक्तिभावाने अक्षता कलशाचे स्वागत करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी शनिवारी केले.
वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावातच आणि आचरणात राम होता. त्यांनी १९८२ साली साखराळे येथे राजारामबापू सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर समाजवादी नेते, विधानसभेचे माजी सभापती वि.स.पागे यांच्या हस्ते श्रीराम मंदीराची पायाभरणी करून भव्य राम मंदीर उभा केले आहे. सध्या हे राम मंदीर परिसरातील राम भक्तांचे पवित्र तीर्थस्थान ठरले आहे.
हेही वाचा >>>गौतम नवलखा यांची पुन्हा चौकशी? भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आहेत नजर कैदेत…
प्रभू रामचंद्र हे आपणा सर्वांचे श्रध्दास्थान असून प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या आयुष्यात पाळलेल्या सर्व मूल्यांचे आपण आचरण करीत एकात्मतेची पताका बांधायला हवी. त्यांचा आदर्श सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील एक प्रगतशील भारत देश घडविण्या साठी कटीबद्ध होऊया. प्रभू रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या आशिर्वादाने आपले जीवन समृध्द बनवूया,असे आवाहन ही त्यानी शेवटी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पत्रक देत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष अँड.चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी नगरसेवक विडनाथ डांगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी होते.