सांगलीत गुरूपुष्य मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज; जयंत पाटील, सुधीर गाडगीळ यांचे शक्तिप्रदर्शन

उमेदवारी दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर बहिष्कार टाकला होता.

MLA Jayant Patil filed nomination from Islampur Constituency,
जयंत पाटील उमेदवारी दाखल करीत असताना

सांगली : काहींनी अधिकृत एबी फॉर्मसह तर काहींनी एबी फॉर्मशिवाय विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूपुष्य नक्षत्राचा मुहूर्त गुरुवारी साधला. यामध्ये मातब्बरांचा समावेश असून जत, इस्लामपूर, तासगाव, सांगली येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तर ज्या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही अशा ठिकाणी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्ह्यात जयंत पाटील, सुधीर गाडगीळ यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

इस्लामपूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जाहीर सभेचे आयोजनही करण्यात आले होते. उमेदवारी दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र यावर बहिष्कार टाकला होता. तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी याबाबत सांगितले की, बोलावणे येऊनही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis : “८५+८५+८५ म्हणजे २७० हे गणित समजून घेण्याचा प्रयत्न सुपर कॉम्प्युटर आणि..”; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला

पलूस-कडेगाव, इस्लामपूर या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नसताना महायुतीमध्ये भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. इस्लामपूरमध्ये निशिकांत पाटील, पलूस-कडेगावमध्ये संग्रामसिंह देशमुख यांनी साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केले. तर खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल केला. स्व. अनिल बाबर यांच्या स्मृतींना अभिवादन करत साधेपणाने उमेदवारी दाखल करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तासगावमधून आर.आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी महाविकास आघाडीतून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी खासदार विशाल पाटील हेही उपस्थित होते. आपल्या वडिलांशी राजकीय संघर्ष केलेल्यांनी आताही संघर्षाची भूमिका घेतली असून यावेळी सामान्य जनता आपल्या पाठीशी असल्याचे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले.

जतमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली नसताना काँग्रेसच्यावतीने आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आपली उमेदवारी दाखल केली. याावेळी शहरातून रॅली काढण्यात आली. तसेच बाजार पटांगणात जाहीर सभाही घेण्यात आली. या सभेत कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, आ. डॉ. विश्वजित कदम, सुजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक उपस्थित होते.

हेही वाचा >>> Congress Candidate List 2024 : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ‘हा’ उमेदवार लढणार

सांगली मतदारसंघामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज असलेले माजी उपमहापौर शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार यांच्यासह नीता केळकर, प्रकाश ढंग, दीपक शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे आदींसह पक्षाचे माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सायंकाळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे इस्लामपूरचा विकास खुंटला : निशिकांत पाटील

सांगली : गेल्या ३५ वर्षांत अकार्यक्षम लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे इस्लामपूर मतदारसंघाचा विकास खुंटला असून या विकासाच्या मुद्द्यावरच आपण निवडणूक लढवत आहोत असे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितले. महायुतीतून उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी वरिष्ठ नेत्यांनी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने श्री. पाटील यांनी आज गाजावाजा न करता महायुतीतील घटक पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत साधेपणाने उमेदवारी दाखल केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ऊसदर, दूध उत्पादकांचे प्रश्न आणि मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, बेरोजगारी या प्रश्नावर चर्चा व्हावी अशीच आपली भूमिका असून यासाठी आपण जनतेच्या दारात जात आहोत. प्रस्थापित नेतृत्वाने केवळ आपला गटच अधिक ताकदवान कसा होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. यामुळे सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यास वेळच दिला नाही. ही निवडणूक ऐतिहासिक होणार असून धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशीच ही निवडणूक होणार असून मतदार आता संधीची वाट पाहत आहे. २०१६ मध्ये ज्या प्रमाणे नगरपालिका निवडणूक मतदारांनी हातात घेऊन प्रस्थापितांना सत्तेवर येण्यापासून रोखले अशीच स्थिती यावेळी संपूर्ण मतदारसंघात आहे. यामुळे यावेळी विजय आपलाच होईल अशी खात्री वाटते. येथील व्यवस्था बदलायची आहे, प्रत्येकाला मान, सन्मान मिळायला हवा, मतदारसंघाचे विकासाचे व्हिजन घेऊन मी मतदारांच्या समोर जात आहे. यावेळी ज्येष्ठ नेते सी.बी. पाटील म्हणाले, इस्लामपूर मतदारसंघातील मतदार आता प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी आसुसलेले आहेत. महायुतीत कोणताही बेबनाव नाही, यामुळे यावेळी एकास एक अशीच लढत होईल. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनीही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत विकासाच्या बाजूने मतदार ठामपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jayant patil sudhir gadgil filed nomination for assembly polls in sangli district with huge supporters zws

First published on: 24-10-2024 at 23:22 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या