मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत, अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, त्यामुळे कृपया तुमचं उपोषण थांबवा, अशी विनंती संभाजी भिडे यांनी जरांगे-पाटलांना केली.
संभाजी भिडे यांच्याभेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. “देवेंद्र फडणवीसांनी संभाजी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वींची त्यांची विधानं फडणवीसांच्या वाट्याला जातील,” असा टोला जयंत पाटलांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, “संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीबद्दल केलेली विधानं अत्यंत आक्षेपार्ह आहेत. सर्व माध्यमांचं लक्ष केंद्रीत असतं, तिथे जाऊन भिडेंनी आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीसांच्यावतीनं तिथे ते गेले नसतील, ही अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसांनी भिडेंना पाठवलं असेल, तर यापूर्वीची त्यांची विधानं फडणवीसांच्या वाट्याला जातील. भिडे स्वत:च गेलेत का? यावर फडणवीस स्पष्टीकरण देतील.”
संभाजी भिडेंनी काय म्हटलं?
“तुम्ही मागे वळून पाहायचं नाही, जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, या निश्चयाने आम्ही तुमच्याबरोबर आहेत. तुम्ही करताय ते अगदी १०१ टक्के योग्य करताय,” असं संभाजी भिडे जरांगे-पाटलांना म्हणाले.
“जोपर्यंत राजकारण्यांच्या हातात मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, शेवाळावरुन चालण्यासारखं आहे. एक चांगलं म्हणजे आता जे राजकारणी सत्तेवर बसलेत, एकनाथ शिंदे अजिबात लबाड नाहीत, देवेंद्र फडणवीस फसवणूक करणार नाहीत, अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असले, तरी काळीज असलेला माणूस आहे,” असं कौतुक संभाजी भिडे यांनी केलं.