शरद पवार यांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी तरुण कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. शरद पवारांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी समितीची स्थापना केली होती. पण, या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला. यानंतर शुक्रवारी ( ५ मे ) सायंकाळी पत्रकार परिषदेत पवारांनी अध्यक्षपदी कायम राहात असल्याची घोषणा केली.
“माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. सर्वांनी दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. सर्वांनी केलेलं आवाहन आणि विनंत्या याचा विचार करून, तसेच मी अध्यक्षपदी कायम राहावे, हा समितीने घेतलेल्या निर्णयाचा मान राखून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.
हेही वाचा : आठ दिवसांपूर्वी प्रकल्पांचं समर्थन करणाऱ्या राजन साळवींची भूमिका का बदलली? उद्धव ठाकरे म्हणाले…
“भाकरी फिरविणार असं आपण जाहीर केलं होतं. पण, राजीनामा मागे घेत भाकरी थापली आहे,” असं सूचक विधान शरद पवारांनी केलं.
मात्र, “शरद पवारांनी राजीनामा द्यावा, यासाठी अनेकजण देव पाण्यात ठेवून बसले होते,”, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांचा रोख कोणाकडं होता, हे कळलं नाही.
हेही वाचा : बारसूत पोलीस आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक; नेमकं घडलं काय?
जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
एका सभेत बोलताना जयंत पाटलांनी म्हटलं, “शरद पवारांच्या राजीनाम्याने वादळ निर्माण झालं होतं. बरेच लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. जे होत आहे, ते व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आहे. शरद पवार नसते, तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते. मात्र, ही शक्यता आता मावळली आहे.”