विधानसभेत आज (३ जुलै) भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मासेमारीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच याप्रकरणी उचित कारवाई करण्याची मागणी केली. राणे यांच्या मागणीनंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला उत्तर दिलं. मुनगंटीवार म्हणाले, मोठे मच्छीमार सरकारच्या डोळ्यात धुळफेक करतात. परवानगी नसलेल्या ठिकाणी तसेच मासेमारी जेव्हा बंद असते तेव्हा देखील मासेमारी करतात. तसेच इतर राज्यांमधील मच्छीमार आपल्या समुद्रात येऊन मासेमारी करतात. आपण त्यांना पकडतो मात्र हे मच्छिमार एकाच वेळी ५० ते ६० लाख रुपयांचे मासे पकडतात आणि त्यानंतर १० लाख रुपयांचा दंड भरून कायद्याच्या कचाट्यातून मुक्त होतात.
अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर तुरुंगवासाची कारवाई करण्याबाबत आमचं सरकार विचार करत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. विधिमंडळाच्या या अधिवेशनात यावर निर्णय झाला नाही तर आम्ही वटहुकूम आणून याबाबतचा कायदा करू, असं आश्वासन मुनगंटीवार यांनी आज सभागृहात दिलं.
मुनगंटीवार यांनी दिलेल्या उत्तरानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील म्हणाले, “गस्त वाढवल्याशिवाय सगळ्या गोष्टी पकडता येणार नाहीत. तसेच गुन्हेगारांवर कारवाई करता येणार नाही. पारंपारिक मच्छीमार संघ असं सांगतात की मोठे मच्छीमार त्यांना त्रास देतात. त्यामुळे त्यांनी मागणी केली आहे की गस्त घालणाऱ्या बोटींची संख्या वाढवायला हवी. तसेच गस्त घालणाऱ्या प्रत्येक बोटीवर पारंपारिक मच्छीमार संघाचा एक प्रतिनिधी असायला हवा. कारण बऱ्याचदा असं होतं की गस्त घालणारं पथक समुद्रात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना पकडतं, मात्र ते समुद्रातच साटंलोटं करतात. गस्त घालणाऱ्या पथकातील अधिकारी या मच्छीमारांना काही पैसे घेऊन सोडून देतात.”
जयंत पाटील म्हणाले, “गोवा, गुजरात व कर्नाटक या तीन राज्यांमधील मच्छिमार महाराष्ट्राच्या समुद्रात येऊन मासेमारी करतात. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यासाठी कडक कायदे करायला हवेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आमचा खूप विश्वास आहे. मुनगंटीवार हे कार्यक्षम मंत्री आहेत, म्हणूनच तुम्ही महाराष्ट्रात राहिले आहात त्याचा आम्हाला आनंदच आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला जो काही कायदा करायचा असेल तो येत्या १२ जुलैपर्यंत करावा. विधिमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर तो कायदा करून घ्या, आम्ही तुम्हाला सहकार्य करू.” नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात मंत्री मुनगंटीवार यांचा दारूण पराभव झाला. परिणामी त्यांचं खासदार म्हणून दिल्लीला (संसदेत) जाण्याचं स्वप्न भंगलं आणि त्यांना महाराष्ट्रातच थांबावं लागलं आहे. त्यावरून जयंत पाटील यांनी सभागृहात मुनगंटीवारांना चिमटा काढला.
हे ही वाचा >> “माझं दुःख ऐकून घ्या, मी कटोरा घेऊन…”, जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मांडली व्यथा
जयंत पाटील म्हणाले, बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना अटक व्हायला हवी. तसेच हे अनधिकृत धंदे करणाऱ्यांना किमान दोन वर्षे तुरुंगवास व्हायला हवा. यासाठी कायदा करण्यात यावा. हा कायदा करण्यात आमचा राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा असेल. तसेच गस्तीसाठी सिंधुदुर्ग, रायगड, पालघरमध्ये बोटींची संख्या वाढवली जावी. गस्तीपथकांच्या बोटींवर पारंपारिक मच्छीमारांचा एक प्रतिनिधी असावा.