Vishalgad Fort : कोल्हापूरमधील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या, विशाळगडावर आणि गडाच्या पायध्याशी असलेल्या काही गावांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. याप्रकरणी २१ आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी सोमवारी (१५ जुलै) कडक बंदोबस्तात गडावरील १०० हून अधिक अतिक्रमणं हटवली आहेत. दरम्यान, अतिक्रमण काढलं जात असताना ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या त्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “विशाळगडावरील दंगलीत सहभागी असणारे शिवप्रेमी असू शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांना असा महाराष्ट्र अपेक्षित नव्हता.”
जयंत पाटील यांनी काही वेळापूर्वी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, विशाळगडावरील अतिक्रमण दूर करावं यासाठी अनेक शिवप्रेमी अनेक वर्षांपासून मागणी करत होते. ती मागणी याआधीच पूर्ण व्हायला हवी होती. तिथलं अतिक्रमण पावसाळ्याच्या अगोदरच दूर करणं गरजेचं होतं. आता ऐन पावसाळ्यात तिथल्या लोकांना कुठे घालवायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण करणाऱ्या इतरांनाही तिथून हटवावं अशा प्रकारचे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. भर पावसाळ्यात त्या लोकांना तिथून हाकलणं योग्य नाही. मात्र अतिक्रमाणाला आमचा पाठिंबा नाही.
हे ही वाचा >> काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला? खासदार विशाल पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण
जयंत पाटलांची पोलिसांवर नाराजी
जयंत पाटील म्हणाले, “अतिक्रमण हटवण्यासाठी जे लोक विशाळगडाच्या पायथ्याशी आले होते, त्यांनी तिथल्या जवळच्या गावात जाऊन मुस्लिम वस्तीवर हल्ला केला. घरांची नासधूस करणे, तिजोऱ्या फोडणे व मालमत्ता लुटणे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित नव्हतं. हे काम शिवप्रेमी करू शकत नाहीत, त्यामुळे त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. या सर्व घटना घडत असताना पोलीस जनतेला संरक्षण देण्याच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. तिथे हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजांचे लोक आहेत. दोन्ही धर्माच्या लोकांनी गडावर अतिक्रमण केलं आहे.”
अजित पवारांची विशाळगडाला भेट
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात आणि विशाळगडावरील अतिक्रमण झालेल्या भागांची आज (१८ जुलै) पाहणी केली. तसेच ज्या अतिक्रमणांवर प्रशासनाने कारवाई केली आहे त्याचीदेखील पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “कोणाच्याही राहत्या घरावर कारवाई होणार नाही”, असं सांगत अजित पवारांनी ग्रामस्थांना धीर दिला.