सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार असून, यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते मुंबईला आज रवाना झाले, तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजपा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सक्तवसुली संचालनालयाने पाटील यांना चौकशीसाठी पाचारण केले असून या नोटीसीनुसार पाटील हे उद्या (सोमवारी) ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीने नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालविली असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीनेही आंदोलनाची तयारी केली आहे. सांगलीमध्ये पक्षाच्या दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करून ईडीच्या कारवाईचा आणि भाजपा सरकारचा निषेध करणार आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी शहर जिल्हा कार्यालयाजवळ जमावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केले आहे. दरम्यान, इस्लामपूरमध्ये ईडी कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या कारवाईच्या निषेधार्थ इस्लामपूर तहसील कचेरीसमोर ईडीचा जाहीर निषेध करून तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा – “मुंबईत भाजपाचा महापौर होणार”, आशिष शेलारांचा दावा, तर शिंदे गटाचे नेते म्हणाले, “महाराष्ट्रातील सगळ्या…”

जयंत पाटील हे उच्चविद्याविभूषित,चारित्र्यसंपन्न आणि निष्कलंक नेते आहेत. त्यांचे ४० वर्षांचे सार्वजनिक व राजकीय जीवन हे एक खुले पुस्तक आहे. मात्र सध्या त्यांच्यावर राजकीय आकसाने ईडी कारवाई केली जात असल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष चिमनभाऊ डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा – VIDEO: “…तर तो काळा पैसा आहे असं म्हणावं लागेल”; २ हजारच्या नोटवरून अर्थतज्ज्ञ विश्वास उटगींचा गंभीर आरोप

प्रतिगामी सत्ता व विचारांच्या विरोधात पाय रोवून दोन हात करीत असल्याने त्यांचा विरोधी आवाज बंद करण्यासाठी राजकीय सूड भावनेतून ही ईडीची नोटीस बजावली आहे. क्रांतिकारकांचा तालुका अशा नोटिसांना भिणारा नाही, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते आज मुंबईला रवाना झाले असून, यामध्ये महापौर दिग्विजय सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहूल पवार आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil will go to ed office on monday activists of sangli district will protest ssb