जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असून राष्ट्रवादीची मागणी आहेच शिवाय तशी भूमिकाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पक्षाच्यावतीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आज मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केली होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार अधूनमधून अशा बैठका घेऊन राज्यातील प्रश्नावर चर्चा करत असतात. राज्यातील सर्व प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये राज्यसभेची निवडणूक, विधानपरिषद,आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावरही चर्चा झाली असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते निर्णय घेतील –
राष्ट्रवादीचे सर्व मंत्री हे जनता दरबार पक्षाच्या मुख्य कार्यालयात घेत आहेतच. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. जिल्हयाजिल्हयात जाऊनही जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपाने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपाला तो घोडेबाजार अपेक्षित नसावा अशी खात्री आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे, त्यामुळे एकत्र निवडणूका लढणार आहोत. मतदान १० जूनला आहे. त्यामुळे बराच वेळ आहे, असे सूचक वक्तव्यही जयंत पाटील यांनी केले.