भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. याचबरोबर, द काश्मीर फाईल्स चित्रपटावरूनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“ नवरा, बायको, पाहुणे अशा बिरुदावल्या आमच्यातल्या सगळ्यांना ते देत आहेत, पण षंढाना काय बिरुदावली द्यायची? षंढ हे या कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे त्यावर मी काही जास्त बोलत नाही.” असं जयंत पाटील यांनी आज रत्नागिरीत माध्यमांसमोर बोलून दाखवलं.
तर, “महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत.” अशा शब्दांमध्ये सुजय विखे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती.
तसेच, “महाविकास आघाडी कोणावरही दबाव टाकत नाही. वेगवेगळ्या एजन्सी येतात आणि आमच्या सरकार मधल्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम चालू आहे. भाजपा आणि वेगवेगळ्या एजन्सी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राचे सरकार पाडण्यासाठी साम,दाम, दंड याचा उपयोग केला जात आहे.” असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.
याचबरोबर द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील यांनी, “चित्रपट येतात आणि जातात, पण प्रामुख्याने एखादा चित्रपट खांद्यावर घ्यावा, त्याचा प्रचार करावा आणि त्याचं मार्केटींग करावं हे सगळं अनाकलनीय आहे. सात वर्षे सत्ता भोगूनही तुम्हाला काश्मीर फाईलच्या निर्मात्याच्या पायाशी का जावं लागतं?” असा सवाल जयंत पाटील यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे.