आयएल अॅण्ड एफएस कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार व संशयास्पद कर्जाचे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता ते ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. जयंत पाटील यांच्यामागे ईडीचा ससेमिरा मागे लावल्याने त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यांनी याविरोधात भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, ईडी चौकशीला हजर राहण्याआधीच जयंत पाटलांनी ट्वीट केलं आहे.
“आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे, असं जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले.
हेही वाचा >> जयंत पाटलांची आज ईडी चौकशी; मुंबई कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, भाजपा आणि ईडीविरोधात आंदोलन
“माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे”, असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, ईडी चौकशीसाठी रवाना होण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “शांतता आणि कायद्याने जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे मी देणार आहे. सर्वांना एकच आवाहन आहे की सर्वांनी शांतता राखावी. आपण विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सगळंच कसं सहजासहजी होईल. काही गोष्टी होत असतात.”
जयंत पाटील राज्याचे माजी गृह आणि माजी अर्थमंत्री आहेत. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सातवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांना शुक्रवारी सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ईडीने बोलावले होते. पण त्यांनी या समन्सबाबत ईडीला पत्र लिहून वेळ मागून घेतली होती. त्यानुसार ईडीने जयंत पाटील यांना आठवड्याभराची मुदत दिली आहे. पाटील यांना ईडीने दुसरे समन्स बजावले असून त्यात २२ मे रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आयएल अॅण्ड एफएसने दिलेल्या संशयास्पद कर्जप्रकरणी पाटील यांची ईडी चौकशी करणार आहे.
इस्लामपूरचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर ईडी आणि भाजापाविरोधात आंदोलन पुकारले आहे. जयंत पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात येत असून जयंत पाटलांच्या मुंबईतील घराबाहेर बॅनरबाजीही करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य परिस्थिती टाळण्याकरता राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे.