सांगली : सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि जतमध्ये उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच बंडखोरीचे संकेत मिळाले. आमदार सुधीर गाडगीळ यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी आपण उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, काँग्रेसमध्येही उमेदवारीची स्पर्धा तीव्र झाली असून, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. जयश्री पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत यंदा आपणास उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>सांगलीत महापालिका शाळेत तब्बल ४० विद्यार्थ्यांना मारहाण, शिक्षिका निलंबित

सांगली मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीसाठी डोंगरे यांचे प्रयत्न सुरू होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीतच आ. गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर होताच, डोंगरे यांनी बंडाचे निशाण हाती घेत उमेदवारी दाखल करणार असल्याचे सांगितले. गेल्या निवडणुकीवेळी माझ्या उमेदवारीचा प्राधान्याने विचार करण्याचा शब्द नेत्यांनी दिला होता, असे ते म्हणाले.

जतमध्ये भाजपची उमेदवारी आ. पडळकर यांना दिली जाण्याची शक्यता लक्षात घेउन तमणगोडा रविपाटील, प्रकाश जमदाडे, शंकर वगरे, प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी एकत्र येत माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली भूमिपूत्र वगळून जर उमेदवारी भाजपने दिली तर बंडखोरी अटळ असल्याचे सांगत बंडाचे निशाण हाती घेतले आहे. जगताप सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून एकदिलाने निवडणूक लढविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. तथापि, भाजपकडून उमेदवारीची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा >>>Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केली शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी, बंडात साथ दिलेल्या किती आमदारांना संधी?

दरम्यान, महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेले नसताना सांगली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांची बैठकही पार पडली. या बैठकीस माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनीही हजेरी लावली. तर या जागेसाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही आग्रही असून, त्यांनी मुंबईत तळ ठोकला आहे.