Jayashree Thorat Demands Vasant Deshmukh Arrest : माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांचे समर्थक व भाजपा नेते वसंत देशमुख यांनी भाषण केलं. वसंत देशमुख हेच सभेचे अध्यक्ष होते. या भाषणात त्यांनी संगमनेरचे आमदार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. जवळपास एक मिनिट ते जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दांत टीका करत होते. दरम्यान, देशमुखांच्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला, तसेच काही ठिकाणी जाळपोळही झाली. त्यानंतर थोरात व काँग्रेस कार्यकर्त्यांनी वसंत देशमुखांना अटक करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी अटक केली नाही.
वसंत देशमुखांना अटक न झाल्याने जयश्री थोरातांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी जयश्री थोरात, शिवसेना (ठाकरे) खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि ५० हून अधिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर जयश्री थोरात अधिक आक्रमक झाल्या व त्यांनी पोलीस प्रशासनावर टीका केली.
“महिलांचा अपमान करणारे मोकाट अन् पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले”
जयश्री थोरात म्हणाल्या, “वसंत देशमुख यांना अटक झाली पाहिजे. खरंतर पोलिसांनी याप्रकरणी वेळेत कारवाई केली असती तर आम्हाला आंदोलन करावं लागलं नसतं. चार-पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं. भर थंडीत, कुडकुडत ठिय्या आंदोलन केलं. माझ्याबरोबर आमचे कार्यकर्ते व सामान्य जनता तिथे आंदोलनाला उपस्थित होती. सर्वांनी भक्कम राहून मला पाठिंबा दिला. त्यानंतर पोलिसांनी वसंत देशमुख व इतर काही जणांविरोधात गुन्हे दाखल केले. मात्र, आमच्याविरोधातही गुन्हे दाखल केले. महिलांचा अपमान करणारे मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत.
हे ही वाचा >> Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..
शनिवारी (२६ ऑक्टोबर) वसंत देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते. त्यानंतर जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने वसंत देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. तत्पूर्वी बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला होता की “वसंत देशमुखांना लपवून ठेवलं आहे, त्यांना फरार केलं आहे”. अखेर काही वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे.