Jayashree Thorat : भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सुजय विखे पाटील यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ.जयश्री थोरात यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. यावरून विखे आणि थोरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलं आहे.

आता जयश्री थोरात यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जयश्री थोरात यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देत अटक करायची असेल तर मला करा, पण बाकीच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही, असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला आहे.

हेही वाचा : Priti Band : उद्धव ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत बडनेरात ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष निवडणूक लढणार

जयश्री थोरात काय म्हणाल्या?

“सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहेत, सर्वांनी मला पाठिंबा दिला. माझ्याबरोबर असणारे सर्वजण सर्वसामान्य नागरिक आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता? खरं तर तुम्हाला काही वाटायला हवं. मी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. कोणाच्यातरी दबावाखाली काम करता आणि दबावामुळे तुम्ही गुन्हे दाखल करता. ज्यांनी माझ्याबाबत विधान केलं ते फरार आहेत. मग मला न्याय देण्याची आवश्यकता असताना विषय दुसरीकडे भरकटवला जात आहे. मात्र, मी आता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहे”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे.

“अटक करायची असेल तर मला अटक करा. मात्र, या सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचं काम करायचं नाही. आता दिवाळी आली आहे, त्यामुळे प्रत्येकांच्या घरी दिवाळी साजरी केली जाते. मात्र, ते सर्वसामान्य लोकांची दिवाळी खराब करत आहेत. तरीही तुम्हाला असं वाटतं का? की तुमच्याबरोबर संगमनेर तालुका तुमच्याबरोबर राहील? मी संगमनेर तालुक्याला चांगले ओळखते. हा सर्व तालुका आमच्याबरोबर आहे. मी आता पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणार आहे. अटक करायची असेल तर मला करा, पण बाकीच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही”, असा इशारा जयश्री थोरात यांनी दिला आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.

कोण आहेत वसंतराव देशमुख?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक या गावचे रहिवासी असलेले देशमुख हे तालुक्यामध्ये थोरात यांचे पारंपारिक विरोधक आहेत. सुरुवातीला दिवंगत भाऊसाहेब थोरात, त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर ते कायम टीका करत आलेले आहेत. यातून अनेकदा वादावादीचेही प्रकार घडले होते. संगमनेर साखर कारखान्याच्या एका वार्षिक सभेमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिवंगत भाऊसाहेब थोरात यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. कदाचित वाढत्या वयामुळे गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणापासून तसे अलिप्त होते. मात्र, सुजय विखे यांच्या सभेचे अध्यक्ष स्थान त्यांना देण्यात आले होते. येथेही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ उठला.