भारत आणि बांगलादेश संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेला १४ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. नुकतेच बीसीसीआयच्या एक सूत्राने सांगितले की, दुखापत झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी एक गोलंदाजाची संघात निवड करण्यात आली आहे. तो गोलंदाज दुसरा कोण नसून जयदेव उनाडकट आहे. जयदेव उनाडकट तब्बल १२ वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे. अशात उनाडकटचे एक ट्विट चर्चेत आले आहे.
जयदेव उनाडकटने जानेवारी २०२२ मध्ये एक ट्विट केले होते, त्या ट्विटमध्ये त्याने रेड बॉलला संधी देण्यास सांगितले होते. आता, जवळपास ११ महिन्यांनंतर, रेड बॉलने त्याच्या आवाहनाकडे लक्ष दिले आहे. कारण दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी १४ डिसेंबरपासून, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जयदेव उनाडकटचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
उनाडकटने १२ वर्षांपूर्वी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत पदार्पण केले होते, परंतु त्या कसोटीत त्याला एकही बळी घेता आला नाही. त्यानंतर आता त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, या गेल्या १२ वर्षांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेट्स घेतल्या आणि आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने चाहत्यांची मने जिंकली. अशात, जेव्हा त्याला भारतीय संघात संधी मिळत नव्हती, तेव्हा त्याने यावर्षी जानेवारी २०२२ मध्ये एक ट्विट केले होते.
या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, “प्रिय रेड बॉल, कृपया मला आणखी एक संधी द्या. मी तुम्हाला अभिमान बाळगण्याची संधी देईन. हे माझे वचन आहे.”
आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सनेही त्याचे हे जुने ट्विट रिट्विट केले आहे. उनाडकटचे हे ट्विट आता व्हायरल होत आहे कारण जवळपास ११ महिन्यांनंतर रेड बॉलने त्याची हाक ऐकली आहे आणि तो पांढऱ्या जर्सीमध्ये भारताकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते की नाही, हे येणारा काळच सांगेल, पण तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला तर आता रेड बॉलने त्याला दिलेले वचन पूर्ण करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. कारण रेड बॉलने एक संधी दिली आहे.