नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींची खंडणी मागून बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या जयेश पुजारी व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) बंगळुरूमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या जयेशला दोन दिवसांत ‘एनआयए’ ताब्यात घेणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जयेश पुजारी ऊर्फ सलीम शाहीर हा बेळगाव कारागृहात बंदिस्त असताना दाऊद टोळीच्या दोन सदस्यांच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने दाऊद गँग, अल-कायदा, पीएफआय आणि लष्कर- ए- तोएबा यांच्याकडून आसाममध्ये शस्त्र आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या सर्व कृत्यामुळे जयेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर जयेशला मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले. नागपूर पोलिसांनी जयेशला ताब्यात घेण्यासंदर्भात ‘एनआयए’ कार्यालयाला पत्र लिहिले होते. त्यामुळे मुंबई ‘एनआयए’च्या पथकाने जयेश पुजारीची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचे दस्तावेज ताब्यात घेतले असून आता कारागृहातून जयेशला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.