Jaykumar Gore : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच ‘आपलं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी शरद पवारांच्या पुढे कधीही झुकणार नाही’, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी टीका केली होती.

यानंतर आता जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक सूचक विधान केलं आहे. ‘कितीही षडयंत्र करा, पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठा आहे’, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कोणाकडे होता? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले?

“माझा ते पराभव करू शकले नाहीत. त्यांनी सर्व ताकद पणाला लावली. सर्व बाजूंनी मग त्यामध्ये पक्षामधून आणि पक्षाच्या बाहेरून ताकद लावली पण तरीही माझा पराभव करू शकले नाहीत. तेव्हा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला. असे कितीतरी षडयंत्र रचले, कितीही चक्रव्यूह टाकले तरीही मी देखील आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पठ्ठ्या आहे हे लक्षात ठेवा”, असा सूचक इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

आमदार बाबासाहेब देशमुखांना ऑफर?

मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलताना शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना एक प्रकारे भाजपात येण्याची ऑफर दिली. मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, “शहाजी बापू पाटील यांनी काही वेळापूर्वी सांगितलं की फक्त भाषण करून पाणी येत नाही. आता मी एवढंच सांगतो बिना पाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. देवाभाऊंच्या विहिरीत मुबलक पाणी आहे, तिकडेच विचार करायचा. पाणी असूनही द्यायला नको का? मात्र, पाणी देण्यासाठी दानत लागते. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्व गोष्टींचा विचार करायचा, तसेच आपल्या तालुक्याला कोण काय देणार? याचाही विचार आपण केला पाहिजे”, असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार बाबासाहेब देशमुखांना ऑफर दिली.

शहाजी बापू पाटलांनी स्वत:च्या तोंडात चापट मारली

माजी आमदार शहाजी बापू पाटील हे एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वत:च्याच तोंडात मारून घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कृतीने सभेत चांगलाच हशा पिकला होता. यावेळी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्वत:च्याच तोंडात चापट मारून घेतली तेव्हा व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह काही नेते देखील उपस्थित होते. शहाजी बापू पाटील म्हणाले की, “ज्यांनी पाणी आडवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं. पण ज्यांनी तुम्हाला पाणी दिलं, त्यांना तुम्ही घरी बसवलं. त्यामुळे आपल्याला देखील काहीतरी वाटायला पाहिजे, आपल्या या चुकीमुळे आपण तोंडात मारून घ्यायला पाहिजे”, असं म्हणत शहाजी बापू पाटील यांनी भरसभेत स्वत:च्या तोंडात चापट मारून घेतली. शहाजी बापू पाटील यांच्या या कृतीवर सभेत एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.