Jaykumar Gore vs Sanjay Raut & Rohit Pawar : शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “शिवछत्रपतींच्या काळातील स्वराज्याचे सरसेनापाती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका महिलेला गोरे यांनी त्रास दिला, तिचा विनयभंग केला”, असा दावा राऊत यांनी केला होता. त्यंच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले होते. तसेच राज्य सरकारवरही टीका केली होती. या टीकेला जयकुमार गोरे यांनी आज विधीमंडळातून उत्तर दिलं आहे. जयकुमार गोरे यांनी संजय राऊत व रोहित पवार यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनी तो प्रस्ताव स्वीकारून हक्कभंग समितीकडे पाठवला आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, “सातारा न्यायालयातील २०१७ मधील एका प्रकरणाचा उल्लेख करत संजय राऊत यांनी माझ्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर बिनबुडाचे व अश्लाग्य असे आरोप केले. आक्षेपार्ह भाषा वापरून माझ्यावर बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जनमानसात माझी प्रतिमा मलीन केली. त्यानंतर मला सर्वांच्या टीकेला उत्तर द्यावं लागलं. आज विधिमंडळाच्या कामकाजावर परिणाम व्हावा यासाठी जाणीवपूर्वक ते कृत्य केलं गेलं. परंतु, मला या सभागृहाला सांगायचं आहे की २०१७ मधील त्या प्रकरणाचा निकाल २०१९ मध्ये लागला. न्यायालयाने त्या प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाचा निकाल मी माझ्या तक्रारीत मांडत आहे. तसेच न्यायालयाने त्या प्रकरणाशी संबंधित मुद्देमाल नष्ट केला आहे. तरी देखील संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग केला आहे. न्यायालयाचा अपमान केला आहे, या सभागृहाचा अवमान केला आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत आहे.”

रोहित पवारांविरोधातही हक्कभंगाचा प्रस्ताव

ग्रामविकास मंत्री म्हणाले, “संजय राऊत यांच्याबरोबर आमदार रोहित पवार यांनी देखील सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावरून माझ्यावर वेगवेगळे बेछुट आरोप केले. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात देखील हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला आहे. माझ्यावर, माझ्या कुटुंबाच्या, पक्षाच्या, पक्ष नेतृत्वाच्या बदनामीसाठी खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम राऊत व रोहित पवार यांनी केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

दरम्यान, यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “गोरे यांनी जरूर हक्कभंग आणावा. मुळात ते कोणाविरोधात हक्कभंग आणतायत? त्या महिलेवर हक्कभंग आणताय का? जिचा तुम्ही छळ केलात तिच्याविरुद्ध हक्कभंग आणताय? मला एक गोष्ट समजत नाहीये की या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात घेतलंच कसं? मंत्री झाल्यावर ते परत त्या महिलेला त्रास देऊ लागले आहेत. त्यामुळे ती महिला येत्या १७ मार्चपासून मुंबईतील आझाद मैदान व विधीमंडळाबाहेर आंदोलन करणार आहे. उपोषणाला बसणार आहे.

Story img Loader