Jaykumar Gore Reaction : सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला आहे. शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हा आरोप केला. या महिलेला जयकुमार गोरे यांनी अश्लिल फोटो पाठवल्याचा दावा राऊतांनी केला असून याप्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय. दरम्यान, आरोप प्रत्यारोप होत असताना आता जयकुमार गोरे यांनी आज विधानभवनातून माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळून लावले.

कोर्टाने निर्दोष मुक्त केलं आहे

जयकुमार गोरे म्हणाले, “२०१७ साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. माझ्या विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतर मसवड पालिकेची निवडणूक होती. त्याच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. २०१९ साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.”

“कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोकशाहीत सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. न्यायालयाच्या या निकालाला सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षांनी हे प्रकरण समोर आलं आहे. कोणत्या वेळी काय बोलावं, याची मर्यादा राजकीय नेत्यांनी ठेवावी”, असा पलटवारही जयकुमार गोरे यांनी यावेळी केला.

अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

ते पुढे म्हणाले, “माझ्या वडिलांचं सात दिवसांपूर्वी निधन झालं. त्यांनी मला वाढवून, संघर्ष करून इथपर्यंत आणलं. त्यांचं अस्थी विसर्जनही करू दिलं नाही. इथपर्यंत राजकारण करावं असं मला अपेक्षित नव्हतं. शेवटी राजकारणात सर्व गोष्टी होत राहतात. माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत. मी एवढंच सांगतो, या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे, त्यांच्यावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच आणणार आहे. मी माझ्या बदनामीचा खटला दाखल करणार आहे, जी कारवाई अपेक्षित आहे ती मी करणार आहे”, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

Story img Loader