अकोला : राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम करणारे मजूर जेसीबीमध्ये झोपले असतांना मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे जेसीबी नाल्यात कोसळले. त्यातील चार मजूर पाण्यात अडकले. स्थानिकांच्या मदतीने तीन मजुरांना वाचवण्यात यश आले तर एक १८ वर्षीय मजूर वाहून गेला. ही घटना अकोला तालुक्यातील कुरणखेड जवळ घडली.

अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या मार्गावर कुरणखेड काटेपूर्णा नदीजवळ एक मोठा नाला आहे. त्याठिकाणी दोन जेसीबीद्वारे पुलाचे काम सुरू होते. रात्री काम झाल्यानंतर चार मजूर याच जेसीबींमध्ये झोपी गेले. रात्री पावसाचा जोर वाढला. नाल्याचा पाण्याचा ओढा जेसीबीपर्यंत पोहोचला. यात तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आले. एक युवक मात्र वाहून गेला. त्या युवकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सचिनकुमार प्रसाद (१८) असे त्या युवकाचे नाव आहे. घटनेमधील चारही मजूर बिहार येथील रहिवासी आहेत.